कीव : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की यांच्यात वाद झाल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला पुरवली जाणारी लष्करी मदत रोखली. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांनी वोल्डोमीर झेलेन्स्की यांना युक्रेनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याची योजना आखली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन अधिका-यांना झेलेन्स्की हटाव मोहीमेविषयी सूचना केली असून, अधिका-यांनी त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे चार अधिकारी युक्रेनला पोहोचले आणि युक्रेनमधील विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. युक्रेनमध्ये लवकरच अध्यक्षपदाच्या निवडणुका व्हाव्यात हा या बैठकीचा उद्देश होता.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वरिष्ठ सहाय्यकांनी युक्रेनच्या विरोधी पक्षनेत्या युलिया टिमोशेन्को आणि पेट्रो पोरोशेन्को यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. ट्रम्प अधिका-यांनी युक्रेनच्या नेत्यांना विचारले की, युक्रेनमध्ये निवडणुका कधी व्हाव्यात आणि त्यासाठी काय करावे लागेल?
दरम्यान, युक्रेनने अलीकडेच पोरोशेन्को यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. पोरोशेन्को हे यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. झेलेन्स्की यांनी निवडणुकीत पोरोशेन्को यांचा पराभव केला होता. युक्रेनमध्ये लवकरच निवडणुका झाल्या तर झेलेन्स्की यांना युद्ध गुन्हेगार म्हणून नुकसान सहन करावे लागू शकते.
युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू
युद्धामुळे युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू आहे. शांतता करार होईपर्यंत आणि युक्रेन पुन्हा रुळावर येईपर्यंत येथे निवडणुका होणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. युक्रेनमध्ये २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि झेलेन्स्की यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपला. पण, युद्धामुळे अद्याप निवडणुका घेण्यात आल्या नाहीत.