वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेने आता स्पष्ट भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना स्पष्ट शब्दांत अल्टीमेटम दिला आहे. आता बस्स. युद्ध थांबवा. काही आठवड्यांत शांतता करार झाला नाही, तर अमेरिका यामधून माघार घेईल, असा इशारा ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचे प्रमुख पुतीन आणि झेलेन्स्की यांना दिला आहे.
पॅरिसमध्ये युक्रेन आणि युरोपीय नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अमेरिका ही संघर्ष मिटवण्यासाठी अनेक महिने वाट पाहणार नाही. आम्हाला काही दिवसांत किंवा आठवड्यांत निर्णय घ्यावा लागेल. जर तसं झालं नाही, तर आम्हाला इतर प्राथमिक गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल.
रुबियो म्हणाले की, ट्रम्प यांना वाटते की, युक्रेन आणि रशियामधील शांतता प्रक्रियेसाठी भरपूर वेळ दिला गेला आहे. हे महत्त्वाचं आहे, पण त्याचवेळी अनेक इतर बाबी आहेत ज्या तितक्याच किंवा त्याहूनही अधिक लक्ष देण्यासारख्या आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात युक्रेनबरोबर काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अमेरिका युक्रेनमधील खनिज संपत्तीमध्ये आपला हिस्सा मिळवू शकेल.
दरम्यान, ट्रम्प यांनी निवडणुकीपुर्वी त्यांच्या प्रचारात वचन दिले होते की, व्हाईट हाऊसमध्ये सत्ता हाती घेतल्यावर पहिल्याच २४ तासांत युक्रेनमधील युद्ध थांबवतील.