25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसंपादकीययुद्ध समाप्तीचे संकेत!

युद्ध समाप्तीचे संकेत!

सुमारे अडीच वर्षापासून रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध समाप्त होण्याचे संकेत मिळत आहेत. युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटविण्यासाठी आपण भारत, ब्राझील आणि चीन या देशांशी सातत्याने संपर्कात आहोत, असे रशियन अध्यक्ष पुतीन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या अधिवेशनात पुतीन यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याचे संकेत मानले जात आहेत. या मुद्यावर वाटाघाटीची युक्रेनची तयारी असेल तर मी पण त्या दिशेने पाऊल टाकण्यास तयार आहे, असे पुतीन म्हणाले. युक्रेनने याबाबत आधीच तयारी दाखवली आहे.

गत ऑगस्ट महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांना भेट दिली होती. रशियन दौ-यात मोदी यांनी पुतीन यांची गळाभेट घेतली होती त्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली होती. नंतर मोदी यांनी कीवमध्ये झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. या दोन्ही देशांचा भारतावर विश्वास आहे. भारताने मध्यस्थीची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा दोन्ही देशांनी व्यक्त केली आहे. मित्र आणि सहका-यांचा आम्ही आदर करतो, असे पुतीन यांनी म्हटले आहे. अडीच वर्षानंतर का होईना रक्तपात किंवा हिंसाचार थांबवण्याची गरज दोन्ही देशांना भासू लागली आहे हेही नसे थोडके! भारताच्या पुढाकाराने जगात शांतता प्रस्थापित होत असेल तर ती भारतासाठी अभिमानाची बाब आहे. कारण शांततेचा मार्गच जगाचे हित साधू शकतो. रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी युक्रेनशी चर्चेचा मार्ग खुला करण्यात भारताची मदत होऊ शकते, असे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात असलेले विश्वासाचे आणि मैत्रीचे संबंध पाहता या वादावर तोडग्यासाठी तेच पहिले पाऊल उचलू शकतील, असे पेस्कोव्ह म्हणाले. रशिया-युक्रेन युद्धाला जबाबदार कोण, कोणाच्या आकांक्षा अधिक घातक होत्या, कोणी कोणाला चिथावणी दिली यावर गत अडीच वर्षात चर्वितचर्वण झाले आहे.

मुद्दा असा की, ज्यांचे युद्धात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हितसंबंध गुंतले होते त्यांना त्याची झळ न पोहोचता दोन्ही देशांच्या सर्वसामान्य जनतेला त्याचा चटका सहन करावा लागला. युक्रेनला नाटोमध्ये सहभागी व्हायचे होते. अमेरिका आणि त्याचे मित्र देश यासाठी सक्रिय झाले आणि तेथेच पुतीन यांना कारण मिळाले. तेल आणि इतरही अनेक बाबींचा स्वार्थ त्याच्या मुळाशी होता. दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी हे युद्ध प्रतिष्ठेचा विषय बनवला. युद्ध थोपवण्याचे प्रयत्न झाले असले तरी ते सगळे एकतर्फीच होते. मुळात जे प्रत्यक्ष युद्धात गुुंतले होते त्यांनाच शांततेत फारसे स्वारस्य नव्हते. जे शांततेसाठी पुढाकार घेत होते त्यांच्यावर विश्वास नव्हता. अमेरिकेने युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता तरी ती युक्रेनच्या पाठीशी उभी होती. युरोपातील अन्य राष्ट्रेही अमेरिकेची री ओढत होते.

त्यांनी शस्त्रापासून ते पैशापर्यंत युक्रेनला मदत केली होती. या सा-या बाबी रशियाला डिवचण्यास कारणीभूत ठरल्या. जेव्हा आत्मसन्मानासाठी लढावे लागते किंवा अन्यायाचा प्रतिकार करावा लागतो तेव्हा तो स्वत:च्या ताकदीवर करायचा असतो. कोणी पाठिंब्याचा शब्द दिला म्हणून आपण युद्धभूमी गाठायची नसते. स्वाभिमानासाठी लढताना नुकसान सोसावे लागले तरी त्यापासून भविष्याच्या संदर्भात प्रेरणाच मिळत असतात. युक्रेनची गल्लत येथेच झाली. रशियासमोर आपला निभाव लागू शकतो का याची त्यांना निश्चितच कल्पना असणार मात्र इतरांच्या मदतीवर आणि रसदीवर त्यांनी हे धाडस केले. युक्रेनची बाजू घेत अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले. अन्य देशांनीही तसेच करावे म्हणून दबाव आणला. अमेरिका अशी उघड बाजू घेत असताना चीनने आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. रशिया युद्धाच्या मार्गावरून मागे फिरणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. यात अमेरिकेला शह देण्याचा स्वार्थ होता. भारत हा एकमात्र असा देश होता की, जो या दोन्ही देशांच्या दबावामुळे झुकला नाही. भारताने रशियाशी असलेल्या जुन्या मैत्रीपूर्ण संबंधांना जागत त्या देशाशी आपला व्यवहार सुरूच ठेवला.

उलट इंधनाच्या आयातीसंदर्भात जे निर्णय घेतले ते भारताला लाभदायकच ठरले. भारताची युक्रेन संदर्भातली भूमिकाही संतुलितच होती. युरोपीय देशांनी भारत-रशिया संबंधांकडे बोट दाखविले तेव्हा त्याला सडेतोड उत्तर देताना आमच्या गरजा कशा पूर्ण करायच्या या संबंधी आम्हाला सूचना करण्याची गरज नाही, असे सुनावले. नकारात्मक वातावरण असले की काही वेळा त्रागा होतो. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्या गळाभेटीनंतर झेलेन्स्की यांनी असाच त्रागा केला होता. तेव्हाची त्यांची प्रतिक्रिया अगदी टोकाची होती. आता मात्र झेलेन्स्की यांना समजले असावे की, गळाभेट हा भारताच्या संस्कृतीचा एक भाग आहे त्यामुळे त्यांचे गैरसमज दूर झाले असावेत. भारताच्या भूमीवर शांतता बोलणी व्हावी, असा प्रस्तावही त्यांनी दिला आहे. युक्रेन-रशिया युद्धात दोन्ही देशांना भेट देणारा आणि दोन्ही देशांचा विश्वास असलेला भारत एकमेव देश आहे हे सिद्ध झाले आहे. अमेरिकेला हे युद्ध थांबवता आले असते; पण त्यांनी दुसरा मार्ग पत्करला. भारत मात्र आपल्या भूमिकेवर सातत्य ठेऊन आहे म्हणून आज दोन्ही परस्परांचे शत्रू देश भारताच्या पुढाकाराने चर्चेला तयार झाले आहेत.

चर्चा सुरू होईल का, त्यातून काही निष्पन्न होईल का, याची चर्चा आताच नको. मुळात चर्चेची तयारी झाली हेच महत्त्वाचे आहे. शांतता कधीच अशक्य नसते आणि युद्ध हा कधीच अंतिम पर्याय नसतो मात्र युद्धाची खुमखुमी असणा-यांना त्याची तमा नसते. जोपर्यंत ते स्वत: आणि त्यांच्या सोबत इतर त्यात पोळले जात नाहीत तोपर्यंत त्यांची खुमखुमी कायम असते. युद्धाचा उन्माद ओसरतो तेव्हा वास्तवाचे भान येण्यास सुरुवात होते आणि विचारी निर्णय घेतले जातात. आता दोन्ही देशांना युद्धविरामाचा मार्ग सापडला आहे, असे म्हणता येईल. युद्धविराम झाला तर जगात भारताची प्रतिमा झळाळून निघणार यात शंका नाही. भारत आपल्या शेजारी देशालाही शांततेचा मार्ग सुचवतोय; पण त्यांच्या ते लक्षात येत नाही. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यातच आपले हित आहे हे भारत घसाफोड करून सांगतोय; पण शेजा-याच्या ते लक्षात येत नाही. जिथे पिकते तिथे विकत नाही!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR