29.9 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeमहाराष्ट्रयेत्या ४८ तासांत महाराष्ट्रात थंडीची लाट

येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात थंडीची लाट

राजधानी दिल्लीत धुक्याची चादर

नागपूर : राजधानी दिल्लीसह जवळपास सर्वच शहरांवर कम-अधिक प्रमाणात धुक्याची चादर पसरली आहे. सगळीकडे थंडीची लाट आली असून हवामानात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन दिवस धुक्याची चादर अशीच कायम राहील आणि थंडीची लाट देखील कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

थंडी आणि धुक्याची तीव्रता अधिक असणा-या ठिकाणी शाळांच्या वेळांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. गाझियाबाद, मथुरा, अलिगढ यासारख्या ठिकाणी शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी थंडी व धुक्याच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आल्याने शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा पुढील ४८ तासांत राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यावर अधिक परिणाम जाणवणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्याची काही शहरे गारठण्याची शक्यता आहे.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा प्रभाव वाढणार असून राजधानी मुंबईत गुलाबी थंडी पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी थंडी तर मध्येच आभाळ येऊन थंडीची तीव्रता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात विशेषत: विदर्भात अनेक शहरांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाले होते. तर महाराष्ट्रातील उर्वरित शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअसच्या आसपास होता. मागील चार दिवसांपासून धुक्याची चादर सर्वत्र पसरली आहे. तर मध्येच उकाडा देखील जाणवत आहे. मात्र, आता हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR