पुणे : प्रतिनिधी
निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला आज पहाटे अटक करण्यात आली. बीड पोलिसांनी ही कारवाई करत कासले याला पुण्यातील स्वारगेट भागातून ताब्यात घेतले. तो काही दिवसांपूर्वी दिल्लीहून पुण्यात परतला होता आणि स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबला होता. आज पहाटेच्या सुमारास बीड पोलिसांनी त्या हॉटेलवर छापा टाकत त्याला ताब्यात घेतले.
रणजित कासले याने काही दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यानुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचे एन्काऊंटर करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्याची ऑफर त्याला देण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा कासले याने केला होता. या आरोपांमुळे राजकीय आणि पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच तो दिल्लीहून पुण्यात दाखल आला होता. त्यानंतर स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये त्याचा मुक्काम असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. आज पहाटे अंदाजे चारच्या सुमारास बीड पोलिसांनी कारवाई करत कासलेला ताब्यात घेतले. या कारवाईपूर्वी रणजित कासलेने एक व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपण लवकरच पोलिसांसमोर शरण जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात तो पोलिसांसमोर हजर होण्यापूर्वीच बीड पोलिसांनी पुण्यातून त्याला अटक केली.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर रणजित कासलेने काही धक्कादायक आणि खळबळजनक दावे केले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणाशी संबंधित आरोपी वाल्मिक कराड याचे एन्काऊंटर करण्याची ऑफर आपल्याला दिली गेली होती, असा गंभीर आरोप कासलेने केला होता. या खुलाशामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.