25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यारशिया-युक्रेन युद्ध रोखण्यात डोवालांवर मोठी जबाबदारी

रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यात डोवालांवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या दोन वर्षांपासून युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरु आहे. या दोन्ही देशातील युद्ध थांबवावे आणि मध्यस्थीची भूमिका भारताने घ्यावी अशी आशा अनेक देशांना आहे. दरम्यान रशिया-युक्रेनमधील हा संघर्ष कसा थांबवता येईल याकरिता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे रशियाच्या दौ-यावर जाणार आहेत.

अजित डोवाल हे रशियाची राजधानी मास्कोचा या आठवड्यात दौरा करणार आहेत. मागच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनचा दौरा केला होता. मोदी यांनी युद्ध थांबविण्याच्या तसेच युद्धाला पूर्णविराम लावण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली होती. दोन्ही देशांमधील संघर्ष थांबावा यासाठी संपूर्ण जग भारताकडे अत्यंत आशेने पाहत आहे.

युक्रेनचा दौरा केल्यानंतर आणि राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशी भेट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. नरेंद्र मोदी यांनी आपल्या युक्रेन दौ-याची माहिती पुतीन यांना दिल्याची माहिती रशियाच्या दूतावासाने एका निवेदनातून दिली. उपलब्ध माहितीनुसार अजित डोवाल हे शांतता चर्चेसाठी रशिया दौ-यावर येतील असे ठरल्याचे समजते. मात्र याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

दरम्यान, रशियाने युक्रेन युद्धावरून अमेरिकेला देखील इशारा दिला आहे. रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकेची मर्यादा कुठपर्यंत आहे हे त्यांना कळले पाहिजे, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव म्हणाले. अमेरिकेची रशियाबद्दलची संयमाची भावना संपत चालली आहे. हे दोन्ही देशांसाठी चांगले नाही असे सर्गेई लावरोव म्हणाले. युक्रेनला शस्त्रात्रे देताना अमेरिकेने मर्यादेचे पालन केले पाहिजे, असे रशियाचे म्हणणे आहे. मात्र अमेरिकेने ती मर्यादा ओलांडली असल्याचा आरोप रशियाने केला.

२०२२ मध्ये रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरु झाले आहे. हे युद्ध काही दिवसांतच संपेल असे वाटत होते. मात्र आता दोन ते अडीच वर्षे होयला आली तरी हे युद्ध अजूनही संपत नाही. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर इतर देशानी युक्रेनला शस्त्र, रसद, आर्थिक साहाय्य देण्यास सुरूवात केली. त्यामुळे हे युद्ध लांबले असल्याचे म्हटले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR