18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्ररश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी

रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी

- काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी
आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, तेलंगणामध्ये अशाच प्रकारे पोलीस महासंचालक व एका वरिष्ठ अधिका-याने वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतली असता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली होती. गैर भाजपा राज्यात निवडणूक आयोग तात्काळ कारवाई करते पण भाजपाशासित राज्यात निवडणूक आयोगाला काही दिसतच नाही का? असा सवाल लोंढे यांनी केला आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासारखे गंभीर गुन्हे आहेत. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवावे अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या काळात केली असता त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. विधानसभेचा निकाल लागला असला तरी निवडणूक आचारसंहिता संपण्याआधीच गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केलेले आहे, त्यांच्यावर तातडीने कारावाई झाली पाहिजे, असे अतुल लोंढे म्हणाले.

फोन टॅपिंग प्रकरणात नाव चर्चेत
रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.

कोण आहे रश्मी शुक्ला?
रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिक-यांंपैकी त्या एक आहेत. त्यांनी सशस्त्र सीमा बल चे केंद्र प्रमुख म्हणूनही काम केले. याशिवाय त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लाचे नाव चर्चेत होते. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. या प्रकरणात रश्मी शुक्ला आरोपी होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR