धुळे : प्रतिनिधी
ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासंदर्भात संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. असे असताना धुळ्यात ठाकरे सेनेकडून देखील ठाकरे बंधूनी एकत्र येण्याची मागणी करण्यात आली. या पाठोपाठ आता मनसेच्या वतीने देखील धुळ्यात ठाकरे बंधूनी एकत्र येण्याच्या मागणी बाबत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
सध्या हिंदी भाषाची सक्ती केली जात असल्याचा आरोप दोन्ही ठाकरे बंधूंतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा हाती घेत दोन्ही ठाकरे बंधू मुंबईमधील मराठी माणसासाठी एकत्र यावेत; अशी इच्छा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिका-यांना वाटत आहे. त्यानुसार राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
धुळे जिल्ह्यात याबाबत आता चर्चा होत असून ठाकरे गट व मनसेचे कार्यकर्त्यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी एक दिवसापूर्वी एकवीरा देवीला साकडे घालून एकत्र यावेत अशी मागणी केली होती. आता त्या पाठोपाठ मनसेच्यावतीने देखील बॅनरबाजी करून ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात मागणी केली जात आहे.
मनसेने महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले आहे. अर्थात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे; अशी दोन्ही पक्षांचा कार्यकर्त्यांची व पदाधिका-यांची इच्छा असल्याचे दिसून येत आहे.