23.4 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeराष्ट्रीयराजकारणातील सभ्य माणूस गमावला

राजकारणातील सभ्य माणूस गमावला

खा. प्रियंका गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली, मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांचाही आदरांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजकारणात फार कमी लोकांनी सरदार मनमोहनसिंग यांच्याप्रमाणे आदर मिळतो. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणा-यांमध्ये ते कायम उभे राहतील. ख-या अर्थाने समतावादी, हुशार, प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान होते. राजकारणाच्या खडबडीत जगातला एक अनोखा प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस असे मनमोहन सिंग होते, अशा शब्दांत कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली वाहिली. सर्वपक्षीय नेत्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनीही डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आर्थिक संकटात सापडलेल्या देशाची घडी बसविण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉ. सिंग यांनी केले, असे त्या म्हणाल्या. यासोबतच कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह देशभरातील कॉंग्रेस नेते, राज्यातील कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.

उमदा प्रशासक हरपला
डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ज्ञ गमावला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले. देशवासीयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासीयांच्या स्मरणात राहील, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. देशाचे अर्थमंत्री म्हणून अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. उच्चशिक्षित, विनम्र, शालीन, संवेदनशील व्यक्तीमत्त्वाचे ते धनी होते. ते नेहमी देशाला समोर नेण्याचा विचार करायचे. हा देश त्यांना कधीच विसरू शकत नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली.

अर्थव्यवस्था रुळावर आणली : माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल
डॉ. मनमोहनसिंग हे एक मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेला आर्थिक सिद्धांत व त्यांनी लावलेली आर्थिक शिस्त जगाने स्वीकारली होती. पाश्चिमात्य देशामध्येही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आर्थिक मंदीच्या काळात त्यांनी देशाला सावरण्यात मोठे योगदान दिले. यामुळए अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आली. इतिहास त्यांना नेहमी स्मरणात ठेवेल, असे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले.

अर्थतज्ज्ञ, धोरणी, हुशार राजकीय नेतृत्व हरपले  : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ.मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार राजकीय नेतृत्व, अर्थतज्ज्ञ गमावले, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR