मुंबई : वृत्तसंस्था
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप शिंदेसेनेच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी केला. दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमातील मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतप्त झाले असून, अखिल भारतीय साहित्य महामंडळाला पत्र लिहिल्यानंतर आता शरद पवार यांच्यावर आगपाखड केली आहे.
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना खुर्ची देणे, पाणी देणे यावरून संजय राऊतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता नीलम गो-हे यांनी केलेल्या आरोपांवरून संजय राऊत यांनी सडकून टीका करताना शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय चिखलफेक झाली. त्याची जबाबदारी शरद पवार नाकारू शकत नाहीत. ते सुद्धा त्याला जबाबदार आहेत. तुमच्यावर चिखलफेक होते, तेव्हा आम्ही उभे राहतो ना? मग आता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप होत असताना शरद पवार गप्प कसे राहू शकतात? असा सवाल करीत ते म्हणाले, हे साहित्य संमेलन नव्हतेच, त्यात राजकारण झाले.
महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखल करण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन घडवले का? साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवत आहे. सरकारने दोन कोटी दिले तर २५ लाख खंडणी म्हणून काढून घेण्याचे काम साहित्य महामंडळ करत आहे. कार्यक्रम ठरवतात महामंडळ आणि आयोजक सतरंजी उचलण्याचे काम करत आहे, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.