सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्यानंतर राज्यभरात संताप निर्माण झाले आहे. अशात विरोधी पक्षांनीही सत्ताधारी महायुतीला धारेवर धरले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाची पाहणी करण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले होते. यामध्ये जयंत पाटील, अंबादस दानवे, अदित्य ठाकरे आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांचा समावेश होता.
यावेळी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे तिथेच उपस्थित होते. जेव्हा अदित्य ठाकरे आणि मविआचे नेते परिसरात पोहचले तेव्हा राणे समर्थकांनी अदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे यांच्या समर्थकांनीही प्रत्यत्तर देत राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.
इतकेच नव्हे तर पुढे दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये हाणामारी करण्यात महिलाही पुढे असल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना अदित्य यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट, मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी राणे कुटुंबियांबाबत बोलताना अदित्य यांनी त्यांना बुद्धी, उंची आणि कोंबड्यांचा उल्लेख करत डिवचले.
दुसरीकडे घटनास्थळी माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी किल्ल्याच्या परिसरातून अदित्य ठाकरे यांना बाहेर काढण्याची मागणी केली. दरम्यान दोन्ही गट शांत होत नसल्याचे पाहूण पोलिसांनीही लाठीमार केला. दरम्यान यावेळी काही महिलांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.
दरम्यान हा प्रकार घडत असताना खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या समर्थकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे समर्थक ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. दुसरीकडे ठाकरे यांच्या समर्थक असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी खासदार राणे यांच्यावर टीका करत ही घटना घडल्यानंतर स्थानिक खासदार इथे आल्याने संताप व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन
यावेळी शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर धरणा देत असताना उद्धव ठाकरे यांनी फोन करुन त्यांना हिंमत दिली. नारायण राणे समर्थकांनी किल्ल्याचा मुख्य दरवाजा दीड तासापासून अडवून धरला होता. त्यानंतर त्यांनी हा दरवाजा मोकळा करण्यास सुरुवात झाली. भाजप आणि मविआमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी जयंत पाटील किल्ल्यावर दाखल झाले होते. त्यांनी नितेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी वैभव नाईक आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली.