नवी दिल्ली : दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात असलेल्या पीव्हीआरजवळ मोठा स्फोट झाला. या घटनेची माहिती पोलिसांना कॉल करून देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केला असून केंद्रीय तपास यंत्रणांनीही याची दखल घेतली आहे. एनएसजी डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात असलेल्या एका मिठाईच्या दुकाना शेजारी पार्क आहे. त्याच्या भिंतीजवळ हा स्फोट झाला. अग्निशमन विभागाला सकाळी ११.४८ वाजता स्फोट झाल्याचा पहिला कॉल आला होता. सध्या पोलिसांनी स्फोटाची कारणे शोधण्यासाठी वेगाने तपास सुरू केला आहे. एका व्यक्तीने कॉल करून पोलिसांना सांगितले की पार्कजवळ पांढ-या पावडरसारखी दिसणारी वस्तू फुटली आहे. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. न्याय वैद्यकीय पथकालाही घटनास्थळी बोलवण्यात आले होते.
स्फोटानंतर परिसरात एनएसजी कमांडो आणि श्नान पथकालाही आणण्यात आले. परिसराची तपासणी केली जात आहे. हा स्फोट कसा झाला, त्यासंदर्भातील पुरावे शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. या घटनेनंतर केंद्रीय यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. सध्या दिल्लीत निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणूक होत आहे. यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
यापूर्वीही झाला स्फोट
यापूर्वी ऑक्टोबरमध्ये दिल्लीत प्रशांत विहार परिसरातच स्फोट झाला होता. तेव्हा केंद्रीय पोलिस दल प्रशिक्षण केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. २० ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्फोटामुळे परिसरातील गाड्यांचा काचाही फुटल्या होत्या. त्यावेळीही पांढ-या पावडरसारखा पदार्थ मिळाला होता.