मुंबई : प्रतिनिधी
कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. राजन साळवींनी हाती धनुष्यबाण घेत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या गळ्यात शिवसेना शिंदे गटाचे उपरणे घातले आणि राजन साळवींचा शिंदे गटात प्रवेश झाला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. यामुळे कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे,’ असे राजन साळवींनी म्हटले.
रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी हे ‘मातोश्री’चे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही काळापासून विनायक राऊत यांच्याशी राजन साळवी यांचा सातत्याने वाद होत आहे. या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले होते.