कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सूतोवाच
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात अतिवृष्टीमुळे विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रयत्नशील आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे निकष पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस पडत असून, नदी, ओढ्यांना पूर आणि शेत शिवारात पाणी थांबल्याने खरीप पिके हातातून गेल्यात जमा झाली आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या पदरात काहीच पडण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर सर्वत्र पंचनामे सुरू आहेत. त्यातच पावसाचा धडाकाही रोजच सुरू आहे. त्यामुळे पिकांची नासाडी प्रचंड प्रमाणात झाली असून, शेत शिवारात पाणी थांबल्याने रबीलाही याचा फटका बसू शकतो. दरम्यान, अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या शेत शिवाराचा विचार करून नुकसानग्रस्त शेतक-यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासनही भरणे यांनी दिले.
मदत करण्यासाठी
सरकार कटिबद्ध
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. शेतक-यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. लवकरच राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रयत्नशील आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.