नाशिक : प्रतिनिधी
राज्यभरात अवकाळी पावसाने २७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक १३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर नाशिकमध्ये ५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र बाधित आहे. राज्यात फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिका-यांना चांगलेच फटकरले आहे. बैठकीला येताना अपूर्ण माहिती असणा-या आणि गैरहजर असणा-या अधिका-यांवर कोकाटे संतापल्याचे पाहायला मिळाले. गैरहजर राहणा-या अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जेखील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर खरीप हंगामात कोणतेही अधिकारी रजेवर किंवा संपावर जाणार नाहीत, असा इशाराही माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.
बोगस बी बियाणे खते देणा-यावर गुन्हे दाखल करणार
राज्यात खतांचा मोठ्या प्रमाणांत बफर स्टॉक असल्याची माहितीही माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. खते आणि बियाणांचं लिंकिंग कोणी करणार नाही याच्या सक्त सूचना राज्यभरातील कृषी केंद्रांना दिल्या आहेत. बोगस बी बियाणे खते देणा-यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा देखील मामिकराव कोकाटे यांनी दिला आहे. येत्या काही दिवसात कृषी अधिका-यांच्या बदल्या केल्या जातील असेही ते म्हणाले.
जे अधिकारी जाणूनबुजून गैरहजर राहणार असतील याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय टाकणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले. आधी कळवणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही कोकाटे म्हणाले. शासनाने आश्वासन दिल्यानंतरही जर कोणी संपावर जाणार असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
रजेवर, संपावर न जाण्याच्या सूचना
खरीप हंगामात कोणताही अधिकारी रजेवर किंवा संपावर जाणार नसल्याच्या सूचना माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत. संप पुकारून शेतकरी आणि सरकारला कोणीही वेठीस धरणार नाही, अन्यथा प्रशासकीय कारवाई केली जाईल असा इशारा कोकाटे यांनी दिला आहे. दोन दिवसांनी मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यावेळेस कृषी विभाग तयार असल्याचे आश्वासन मी त्यांना देणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले.