वीज पडून मनुष्यहानी, जनावरेही दगावली, वादळात पिके, फळझाडांचे नुकसान
मुंबई/छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मुंबई, पुण्यासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशा सर्वच भागात अवकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून, जोरदार पावसामुळे सर्वत्र उन्हाळी पिके, फळबागांची नासाडी झाली असून, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह वीज कोसळून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. तसेच झाडे उन्मळून पडली. घर, छतांवरील पत्रे उडाले, विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: मराठवाड्यात सर्वत्र तुफान पाऊस पडत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. आठवडाभर सर्वत्र पावसाचा धडाका सुरू असताना बुधवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरी भागांत अनेकांच्या घरात पाणी शिरले.
राज्यात मागील आठवडाभरापासून प्री-मान्सून कोसळत आहे. वादळी वा-यासह ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडात पाऊस कोसळत असून, अनेक ठिकाणी वीज कोसळून मनुष्य हानी आणि जनावरेही दगावली आहेत. वादळी वा-यात पिके जमीनदोस्त झाली असून, फळझाडे उन्मळून पडल्याने फळांचीही मोठी हानी झाली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्येही गेल्या ४ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, बुधवारी दुपारनंतरही मराठवाड्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले.
लातूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले असून, गेल्या ७ दिवसांपासून पावसाचा धडाका सुरू असल्याने फळझाडांसह पिकांची मोठी हानी झाली. मंगळवारी मध्यरात्री, बुधवारीही दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे पाणीच पाणी झाले. जिल्ह्यात यंदा प्रथमच मे महिन्यात ४०० पट पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातही बुधवारी दुपारनंतर जिल्ह्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यात किनवट, माहूर, नायगाव, मुखेड, देगलूर, बिलोली, कंधार, लोहा, भोकर, अर्धापूर, हिमायतनगर, हदगाव तालुक्याला पावसाने झोडपले. यामुळे पिकांसह हळद भिजून मोठे नुकसान झाले. यासोबतच छ. संभाजीनगर, धाराशिव, परभणी, हिंगोली, जालना, बीड जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे.
राज्यातही सर्वत्र मुसळधार
राज्यातही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतही जोरदार पाऊस झाला. यासोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळल्याने अनेक भागांत गुडघ्याएवढे पाणी वाहात होते. सोलापुरातही बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील दुकाने, घरांत पाणी शिरले. पुणे, सातारा जिल्ह्यातही प्रचंड हानी झाली आहे. याशिवाय विदर्भातही सर्वत्र अवकाळी सुरू असून, गडचिरोली जिल्ह्यात मोठा पाऊस झाला. गोंदिया, अमरावती, जळगाव जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला.
कोकण, मध्य महाराष्ट्रात संकट कायम
उत्तर कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीनजीक अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. १२ तासांत तिथेच कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पुढील ३६ तासांत उत्तरेकडे सरकत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीत वा-याचा वेग ३०-४० किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली.