मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात १९ ते २५ मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर जास्त असेल. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अरबी समुद्रात २२ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कडक उन्हामुळ वैतागलेल्या, घामाच्या धारा, चिकचिक नकोशी झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
तसेच आजपासून २५ मे दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कर्नाटक किनारपट्टीजवळ गुरुवारी, २२ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे राज्यात आज,सोमवारपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकण, घाट परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक असू शकतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बुधवारी आणि गुरुवारी ३५ ते ४५ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात. या वा-यांचा वेग ५५ किलोमीटर प्रतितास एवढा होऊ शकतो.
या कालावधीत पावसाचा जोर वाढून स्थानिक पातळीवर सखल भागामध्ये पाणी साचणे, अचानक पूरस्थिती निर्माण होणे, कमकुवत झाडे पडणे, झाडांच्या फांद्या तुटून पडणे, रस्ते, विमान वाहतूक, बोट वाहतूक, रेल्वे यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमकुवत बांधकाम, झाडे येथे पावसामध्ये आश्रय घेऊ नये, अशी सूचना मनपाने केली आहे.
अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्याला पुन्हा झोडपलं
दरम्यान वादळी वारा आणि अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्याला पुन्हा झोडपलं आहे. अमरावतीच्या वरूड, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, धारणी तालुक्यासह इतरही भागात वादळीवारा आणि पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कांदा, केळी,संत्रा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झालं. मेळघाट मध्ये आणि वरूड मध्ये अनेक घरावरील तीन पत्रे उडाले. तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कांदा पिकांचेही मोठे नुकसान झाले.
गंगापूर धरणात पाच दिवसात वाढले २ टक्के पाणी
नाशिकच्या गंगापूर धरणात पाच दिवसात दोन टक्के पाणी वाढले. भर उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली .गंगापूर धरणात सध्या ४६.४१% पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र आता उन्हाळ्यात झालेल्या पाणीसाठा वाढीमुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ४४.४०% पाणीसाठा होता. मान्सून वेळेत दाखल झाल्यास नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.