मुंबई : राज्यात तापमानाचा पारा वाढत जात आहे. पुढील ४८ तासांत तापमानाचा ४० अंशावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं अवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे. तसंच, राज्यात उष्माघाताच्या ३० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. परभणी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात रुग्णसंख्या सर्वाधिक आहे.
वाढत्या तापमानामुळे राज्यात मार्च महिन्यातच ३० जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मागील वर्षी याच कालावधीमध्ये राज्यात ४० जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.
बुलडाणा, गडचिरोली व परभणी या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे सर्वाधिक, प्रत्येकी चार रुग्ण सापडले आहेत. राज्यातील २२ जिल्ह्यांत उष्माघाताचा एकही रुग्ण नाही. नागपूरमध्ये तीन,जालना, लातूर, नाशिक, पालघर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन तर नांदेड, उस्मानाबाद, रायगड, सांगली आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
उष्माघाताची लक्षणे
वाढत्या तापमानामुळे सुरुवातीला निर्जलीकरण, चक्कर येणे, त्वचेवर पुरळ येणे असा त्रास होतो. त्याचबरोबर तीव्र डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, उलट्या होणे, त्वचा कोरडी पडून घाम येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, असा त्रास होतो.
उष्माघातापासून बचाव कसा करावा
नागरिकांनी उष्माघाताची लक्षणे ओळखावीत व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. उन्हाळ्यामध्ये सतत पाणी पिणे आवश्यक असून कडक उन्हामध्ये गरज असल्यासच घरातून बाहेर पडावे असे आवाहन करण्यात येत आहे.