खामगाव : राज्यातच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तापमान वाढल्याने उष्माघाताशी संबंधित रुग्ण वाढत आहेत. अशातच जिल्ह्यात उष्माघाताचे तब्बल ७ रुग्ण असल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने केली. दररोज तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यभरातील उष्माघाताच्या रुग्णसंख्येचा विचार केला तर ती संख्या ४९ वर पोहोचली आहे.
एप्रिलच्या दुस-या आठवड्यात ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान, उष्माघात म्हणजे काय आणि राज्यातील कोणत्या जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण आढळून आले याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक अहवालच राज्याला सादर केला आहे. राज्यात १ मार्च ते २१ एप्रिलदरम्यान उष्माघाताच्या ४९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये तब्बल ७ रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील असल्याचे या अहवालात नमूद आहे. जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे शेती कामावरही त्याचा परिणाम झाला आहे.
सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा तयार करण्याच्या तयारीत आहेत. परंतु वाढत्या तापमानामुळे मजूरही मिळेनासे झाले आहेत. परिणामी, शेतीकामे ठप्प पडली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने आरोग्य विभागाने उन्हात फिरणे किंवा जाणे, काम करणे टाळण्याचे आवाहन केले. त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामीण व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघाताचे कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
खामगाव सर्वाधिक ‘हॉट’
जिल्ह्यात खामगाव शहरात सर्वाधिक तापमान असल्याची नोंद दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही तालुक्यांचे तापमान ४० ते ४१ अंशांवर पोहोचले आहे. अशातच खामगाव ४५ अंशांवर गेले आहे. त्यामुळे सध्यातरी खामगाव शहर जिल्ह्यात सर्वाधिक ‘हॉट’ असल्याचे दिसून येत आहे.