मुंबई : प्रतिनिधी
एप्रिल महिन्यातच सूर्यदेव आग ओकत असल्याने राज्यातील अनेक धरणे, तलावातील जलसाठा कमी झाला. नदी-नाले तर कधीच कोरडेठाक झाले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांसह पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाच्या झळांसोबतच राज्यातील अनेक धरणे, तलावातील जलसाठा कमी झाला आहे. नदी-नाले तर कधीच कोरडेठाक झाले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी टँकरच्या फे-या सुरू झाल्या आहेत. तर राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर हंडे मोर्चे निघत आहेत. उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठीची कोणतीच तजवीज स्थानिक स्वराज्य संस्थांनी न केल्याने नागरिकांचा असंतोष दिसून येत आहे.
अमरावती विभागात भीषण पाणी टंचाई
अमरावती आणि बडनेराचा शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने दिली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेरपिंगळाई जवळ १५०० मिमी व्यासाची पाईपलाईन लीक झाल्याने आता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने अमरावतीसह बडनेरा शहरात जलसंकट उभे ठाकले आहे.
चिखलदरा आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील सात गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील ७७६ गावांसाठीच्या तातडीच्या उपाययोजना ५० टक्क्यांवरच असल्याने पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे.
यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा या पाच जिल्ह्यांतील प्रकल्पांच्या घशाला कोरड पडण्याच्या मार्गावर आहेत.
चंद्रपुरात भीषण पाणी टंचाई
चंद्रपूर शहरातील विविध वॉर्डांत भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मनपाचे दररोज विविध वार्डांमध्ये १८० टँकर फे-या करत आहेत. अमृत योजनेचे कामकाज संथगतीने असल्याने शहराच्या विविध भागात पाणी टंचाई भासत आहे. अपुरे पाणी मिळत असल्याने नागरिक हतबल झाले आहेत.
जालना जिल्ह्यात पाणी टंचाई
जालना जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांपैकी ३ प्रकल्प पूर्णत: कोरडे ठाक पडले असून २४ प्रकल्पांमध्ये केवळ मृत साठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा अधिकच वाढत चालल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. परिणामी झपाट्याने पाणी पातळी खाली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे.
यवतमाळकरांना पाणी टंचाईचे चटके
यवतमाळ जिल्ह्यात ७९ हजार नागरिकांना पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. प्रशासनाकडून ५७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील ३३० गावांत पाणीटंचाईचा फटका बसला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ३ कोटींचा कृति आराखडा तयार करण्यात आला आहे.
धुळेकरांना सध्या दिलासा
धुळे शहराला पाणीपुरवठा करणा-या डेडर गाव तलावामध्ये ९० टक्के जलसाठा शिल्लक आहे. डेडरगाव तलाव हा १५० दशलक्ष घनमीटर क्षमतेचा असून याद्वारे मोहाडी अवधान मिल परिसर या भागामध्ये पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणा-या नकाने तलाव, डेडरगाव तलाव आणि हरणमाळ तलावात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक असला तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.