मुंबई : विशेष प्रतिनिधी
ज्यांच्या बळावर लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे, त्याच पोलिसांच्या मतदानाचा हक्क हिरावला गेल्याचे समोर आले आहे. राज्यभरासह नवी मुंबई पोलिसांकडून त्याबाबत खंत व्यक्त होत आहे. यावेळी पहिल्यांदाच ऑनलाइन झालेल्या प्रक्रियेतील त्रुटींचा फटका पोलिसांना बसला आहे. मात्र, यावर कोणीही उघडपणे बोलायला तयार नाहीत.
बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असताना, बहुतांश पोलिसांना मात्र मतदानाचा हक्क बजावता आला नाही. नवी मुंबई पोलिस दलातील सुमारे साडेचार हजार पोलिसांपैकी सुमारे दोन हजार पोलिसांवर ही नामुष्की आली.
दरवेळी पोलिसांचे पोस्टल मतदान घेतले जाते. मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत ही प्रक्रिया पोस्टामार्फत राबवली जात होती. परंतु यंदा प्रथमच मतदानाची प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात आली. त्यासाठी पोर्टलवर पोलिसांची माहिती भरण्यात आली होती. परंतु पोर्टल डाउनलोड होण्यासह इतर अनेक कारणांनी सुमारे ८० टक्के पोलिसांचीच माहिती भरली गेली.
त्यातही निम्म्याहून अधिक पोलिसांचे अर्ज यादी, भाग क्रमांक चुकीचा टाकणे किंवा इतर कारणांनी मतदान बाद ठरले. यामुळे त्यांचे बॅलेट प्राप्त झाले नाही, काहींना अनेक प्रयत्नानंतर हक्क बजावता आला.
ऑनलाइन पोर्टलचा फटका
– मतपत्रिका मिळवण्यासाठी पोलिसांकडून मागील १५ दिवसांपासून ऑनलाइन माहिती भरून घेतली जात होती. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी माहिती असलेली यादी, भाग क्रमांक अर्जात भरले होते.
– परंतु शेवटच्या क्षणी निवडणूक विभागाकडून होणा-या याद्यांमधील बदलांमुळे सर्वांचेच सिरीयल नंबर, यादी नंबर, भाग नंबर यात बदल झाल्याने त्यांचे अर्ज बाद ठरले.
– याचा फटका नवी मुंबई तसेच राज्यभरातील पोलिसांच्या बॅलेट मतदानावर झाल्याचे दिसून येत आहे.