25.1 C
Latur
Wednesday, May 28, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील धरणांमध्ये वाढला पाणीसाठा! 

राज्यातील धरणांमध्ये वाढला पाणीसाठा! 

ऐन उन्हाळ्यात सुरू झाला पावसाळा    पाणीसाठ्यात ४७ टीएमसी एवढी वाढ 

मुंबई : प्रतिनिधी
 राज्यात यंदा जवळपास १० दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐन उन्हाळ्यात धरणांमधील पाणीसाठा वेगाने वाढला आहे. १९९० नंतर प्रथमच मे महिन्यात राज्यात मान्सून दाखल झाला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यातील सर्व मोठ्या, मध्यम आणि­ लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात ४७ टीएमसी एवढी वाढ झाली आहे. विशेषत: राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनी धरणात गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल २८९ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वाढला असून मृतसाठ्यात असलेले उजनी धरण आता प्लसमध्ये आले आहे.
    जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, १९ मे रोजी राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून १८ हजार ६१७ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता. त्यात ११ हजार ३८१ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त साठा होता. एकूण क्षमतेच्या २८.१० टक्के एवढा हा उपयुक्त पाणीसाठा १९ मे रोजी होता. २७ मे रोजी एकूण पाणीसाठा १९,०५२ दशलक्ष घनमीटरवर पोहोचला असून त्यापैकी ११ हजार ५२० एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठवण क्षमतेच्या २८.४५ टक्के हा साठा आहे.
पावसामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सोलापूर तसेच पुणे जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणे अपेक्षित आहे. मे आणि जून महिन्यात नागरि­कांना पाणीटंचाईच्या झळा बसतात. मात्र, पाणीसाठा वाढत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, नाशिक तसेच कोकण विभागाची चिंता तूर्त मिटली आहे. कोकण विभागात पाणीसाठा वाढलेला नाही. मात्र, ढगाळ वातावरण आणि­ पावसामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी झाला आहे.
मोठ्या-मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी वाढले
  नागपूर आणि­ अमरावती विभागात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नाही. त्यामुळे या विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. मात्र, पुणे, नाशिक, कोकण आणि­ छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये २४ तारखेला ५ हजार ५२९ दशलक्ष घनमीटर एवढा म्हणजेच २५.९० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तो २७ मे रोजी ७ हजार ६२७ दशलक्ष घनमीटर म्हणजे २६.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये हाच आकडा २४ मे रोजी २ हजार ४४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३७.१४ टक्के होता. तो २७ मे रोजी २ हजार ६६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३७.५३ टक्क्यांवर आला आहे.
मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी धरणांचा पाणीसाठा वाढण्याजोगा पाऊस झालेला नाही. उलट कोकण विभागातील पाणीसाठा ३६.८८ टक्क्यांवरून ३५.७५ टक्क्यांवर आला आहे. भातसा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा या धरणांमधील पाणीसाठ्यात सुमारे १ ते २ टक्के घट झाली आहे.
पुण्याची पाणी चिंता मिटली
 पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चार प्रमुख धरणे आहेत. त्यात खडकवासला, पानशेत, वडीवळे आणि आंध्रा धरणाचा समावेश आहे. या चारही धरणांमध्ये पाणी वाढले आहे. यंदा मे महिन्यातच पुण्यातील चारही धरणांच्या परिसरात १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळे धरणांमध्ये २६ मेपासूनच पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा ५.६६ टीएमसी होता. तर कालव्यातून दिवसभर पाणी सोडले तरी पाणीसाठा ५.७० टीएमसी आहे. त्यामुळे यापुढे धरणात पाणी वाढत जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR