31.8 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील पर्यटकांना विमानाने आणणार

राज्यातील पर्यटकांना विमानाने आणणार

राज्य सरकारने केली विमान व्यवस्था, अब्दुल्लांशी संपर्क

मुंबई : प्रतिनिधी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही संपर्क साधून अजित पवार यांनी विशेष विमान सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे.

प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे, हीच प्राथमिकता असल्याचे सांगत पवार यांनी अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिका-यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत मिळावी, यासाठी अजित पवार यांनी अधिका-यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेवर अजित पवार स्वत: लक्ष ठेवून असून राज्य आणि केंद्र सरकार संबंधित यंत्रणांशी ते सातत्याने संपर्कात आहेत. राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेवर ठेवले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशीसुध्दा अजित पवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना मदतीसह धीर दिला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे मृतदेह तातडीने राज्यात आणण्यासह जखमींना आवश्यक उपचार मिळावेत. तसेच पर्यटनस्थळी हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याच्या सूचना अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
६ जणांच्या नातेवाईकांना
प्रत्येकी ५ लाखांची मदत

दरम्यान, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण ६ जणांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली असून जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार असून त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

८३ प्रवाशी आज मुंबईत येणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार काश्मीरमधून महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी श्रीनगर येथून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार इंडिगो कंपनीचे विमान आज महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR