नवी दिल्ली : राज्यात महायुती सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये आता नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. भाजप, काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार असल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटातही निवडणूक निकालानंतर नेतृत्व बदलाच्या चर्चांना जोर आला होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपात एक व्यक्ती, एक पद असे धोरण असल्याने बावनकुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार आहे. पुढील वर्षी १२ जानेवारीला पक्षाचे अधिवेशन असून या अधिवेशनात पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. भाजपमधून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरग्े यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे काँग्रेसला लवकरच अध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची याअगोदरच टर्म पूर्ण झाली आहे. त्यातच पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष दिला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात पक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला पण विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. त्यामुळे तटकरे यांची पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे.