18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील सत्ताप्रयोगाचा महायुतीला फटका?

राज्यातील सत्ताप्रयोगाचा महायुतीला फटका?

भाजपाची डोकेदुखी वाढली

मुंबई : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही राज्यातील सत्ताप्रयोगाचा महायुतीला पुन्हा फटका बसेल असे राजकीय जाणकार म्हणत आहेत. राज्यात जून २०२२ मध्ये भाजप-शिंदेसेना सरकार आले आणि नंतरच्या वर्षी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला.

दरम्यान, राज्यात मागील काही काळात राजकीय घडी विस्कटल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांत फूट पडली. त्यानंतर हे फुटलेले दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीला महायुती आणि महाविकास आघाडीत लढत झाली त्यामध्ये महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा समावेश होता.

तीन पक्ष असे एकत्र आल्याने सत्ता तर मिळाली मात्र आता पुन्हा सत्ता मिळवताना नेमके तीन पक्षांचे असे एकत्र येणे अडचणीचे ठरू लागले आहे. महायुतीतील नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल मतदारसंघातील भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. कारण, तेथे महायुती ही मंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देणार हे उघड आहे. त्यामुळे घाडगे यांना भाजप सोडण्याशिवाय पर्याय नाही, अशी अवस्था आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्ता भरणे आमदार आहेत आणि तिथे भाजपचे गेल्यावेळी पराभूत झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

तिथे दोघांपैकी एकालाच महायुती संधी देऊ शकणार असल्याने इंदापूरही कागलच्या वाटेवर जाईल, अशी चिन्हे आहेत.
लातूर जिल्ह्यातील उदगीरचे आमदार व राज्याचे मंत्री संजय बनसोडे यांना महायुतीची उमेदवारी मिळणार हे लक्षात आल्याने माजी आमदार व भाजपचे नेते सुधाकर भालेराव आधीच शरद पवार गटात गेले आहेत. रामटेक मतदारसंघातील अपक्ष व शिंदे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांना महायुतीने उमेदवारी दिल्यास तेथील भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी बंडाच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते. अशा अनेक मतदारसंघांत महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR