34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील ८ शैक्षणिक विभागांत ८ निवासी शाळा

राज्यातील ८ शैक्षणिक विभागांत ८ निवासी शाळा

 

मुंबई : प्रतिनिधी
बदलत्या काळाच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांचा ख-या अर्थाने सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्यातील विशेष नैपुण्यांचा विकास होणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून आता शालेय शिक्षण विभागाने राज्यातील ८ शैक्षणिक विभागांमध्ये प्रत्येकी एक, अशा ८ निवासी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा या नावाने ओळखल्या जाणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.

या प्रत्येक शाळेची पटसंख्या २०० एवढी असेल. या शाळांसंबंधी विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला. या निवासी शाळा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासूनच सुरू होणे प्रस्तावित आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच २१ व्या शतकाची गरज विचारात घेऊन कला, क्रीडा, शास्त्र व तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा, व्यवस्थापन, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास अशा विविध विषयांच्या विशेष नैपुण्य शाखांचे ज्ञान देणे गरजेचे आहे.

या विचारातूनच राज्य सरकारने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, कोल्हापूर आणि लातूर या आठ शैक्षणिक विभागांमध्ये या शाळा असतील. त्यासाठी अभ्यासगट स्थापन होणार आहेत. त्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण आयुक्त असतील. त्याशिवाय प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, एससीईआरटीचे संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे शिक्षण संचालक, सहसंचालक आणि शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव हे गटाचे सदस्य असतील.

विद्यानिकेतनच्याच
जागी निवासी शाळा
विभागातील ८ पैकी ५ शैक्षणिक विभागांतील धुळे, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, सातारा आणि अमरावती या ५ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या शासकीय विद्यानिकेतनांच्या जागीच आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा सुरू केल्या जातील. त्याशिवाय इतर ३ शैक्षणिक विभागांत अशा विद्यानिकेतनांप्रमाणे सुसज्ज असलेल्या शाळांची निवड केली जाणार आहे. या ठिकाणी निवासाची व्यवस्था, प्रयोगशाळा, वर्गखोल्या आदींची पाहणी करून मगच त्याबाबतचा निर्णय होणार आहे.

शिक्षण आयुक्त
अभ्यासगटाचे अध्यक्ष?
या अभ्यासगटाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण आयुक्त असतील. त्याशिवाय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, एससीईआरटीचे संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे शिक्षण संचालक, सहसंचालक आणि शालेय विभागाचे उपसचिव (शाळा व्यवस्थापन) हे गटाचे सदस्य असतील, असे सांगण्यात आले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR