अमरावती : प्रतिनिधी
महायुतीतून युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेराचे उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ नोव्हेंबर रोजी येथील गोपालनगर टी पॉईंटवर प्रचार सभा घेतली होती. या सभेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट रवी राणांच्या ‘पाना’ने कसायचे आहेत, अशी बोचरी टीका केली होती. रवी राणांच्या प्रचार सभेतील फडणवीसांचे ‘ते’ शब्द खरे ठरले,रवी राणांसाठी राजकीयदृष्ट्या फडणवीस ‘लकी’ ठरले. आता याविषयी जोरदार चर्चा रंगत आहे.
बडनेराचे आमदार रवी राणा यांची विकासात्मक कामे फार मोठी आहेत. खरे तर त्यांना मतदारसंघात प्रचार करण्याची गरजच नाही. कारण त्यांचे निवडणूक चिन्ह ‘पाना’ आहे, याच पान्याने येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट कसायचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. भाजपच्या कोट्यातून बडनेराची जागा रवी राणा यांना देण्यात आली असून त्यांचे बोधचिन्ह पाना आहे
. ते कोणाकोणाचे नट कसतील माहीत नाही. पण आम्हालादेखील विरोधकांच्या डोक्याचे नट कसायचे आहेत, त्यासाठी तुमच्या पान्याची आवश्यकता पडेल, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. अखेर विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येताच महायुतीने २३५ जागांवर विजय मिळवीत महाविकास आघाडीला ‘जोर का धक्का धिरे से’ अशीच धोबीपछाड दिली आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या प्रचार सभेत काढलेले शब्द खरे ठरल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या ‘लकी’ ठरली, यात दुमत नाही