रायगड : प्रतिनिधी
रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने २८ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, येत्या १ मे महाराष्ट्र दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे ध्वजवंदन करणार आहेत. त्याचवेळी नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वज फडकावणार असल्याने अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रिपदाची संधी मिळणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र, नाशिकसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटचे सहकारी दादा भुसे आणि रायगडसाठी शिंदे समर्थक भरत गोगावले यांनीही इच्छाशक्ती दाखवली होती.
रायगडमध्ये गोगावले यांच्या समर्थकांनी आंदोलन छेडल्याने या दोन्ही जिल्ह्यांतील नियुक्तीला काही काळ स्थगिती देण्यात आली. आता मात्र १ मे रोजी होणा-या ध्वजवंदनासाठी महाजन व तटकरे यांची अधिकृत नियुक्ती झाल्याने, पुन्हा एकदा या पदांवर त्यांची वर्णी लागणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भरत गोगावले यांचा संतप्त प्रतिसाद
रायगड जिल्ह्यातील ध्वजवंदनाचा मान अदिती तटकरे यांना दिल्यानंतर भरत गोगावले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी ठामपणे सांगितले की, फक्त झेंडावंदनाचा मान मिळाला म्हणून पालकमंत्रिपद मिळाले असे होत नाही. मी रायगडचा मावळा आहे, माझी तलवार अजूनही म्यान झालेली नाही. गोगावले यांच्या या प्रतिक्रियेमुळे रायगडच्या पालकमंत्रिपदावर अजूनही संघर्ष शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याची उत्सुकता वाढली आहे.