लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील अनेक गावांना रायगव्हाण मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. सध्या उन्हाळयामुळे या प्रकल्पातील पाणी कांही शेतकरी शेतीला वापरत आहेत. त्यामुळे प्रकल्पात अत्यंत कमी पाणी शिल्लक राहिल्याने प्रकल्पातील पाण्याचा होणारा उपसा थांबला नाही, तर नागरीकांना उन्हाळयात तीव्र पाण्याची टंचाई जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने नागरीकांना प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सुचना असतानाही रायगव्हाण प्रकल्पातून पाण्याचा जोरदारपणे उपसा सुरू आहे. या पाणी उपशाला निर्बध लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लातूर तालुक्यातील रायगव्हाण प्रकल्पातून पूर्वी पाठाद्वारे पाणी पुरवठा शेतीसाठी केला जात होता. कालांतराने सदर यंत्राना कमी पाणीसाठयामुळे मोडकळीस आली. या प्रकल्पातून सध्या मुरूड, गाधवड, पिंपळगाव आंबा, वाडीवाघोली, भिसेवाघोली, मसला, माटेफळ, खुंटेफळ आदी गावांच्या पाणी पुरवठयाच्या योजना कांही सुरू आहेत. तर कांही कार्यान्वीत होण्याच्या मार्गावर आहेत. तर कांही गावांनी मागणी केली आहे. रायगव्हाण प्रकल्प मधून सध्या शेतकरी विद्यूत मोटारी व ट्रॅक्टर द्वारे पाण्याचा उपसा करत आहेत. या प्रकल्पातील पाणी खुपच कमी झाल्याने असाच उपासा सुरू राहिल्यास पुढील दहा-पंधरा दिवसांत पाणी संपून जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणी पुरवठा असलेल्या योजनांच्या गावातील नागरिककाना पाणी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
प्रकल्पातील पाणी उपसा बंद करावा.
रायगव्हाण प्रकल्प मधून परिसरातील ५० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. प्रकल्पातील आरक्षीत पाणीसाठयाचा शेतीच्या पिकासाठी शेतकरी उपासा करताना दिसून येत आहेत. सध्या प्रकल्पाच्या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जानवत असल्याने होणारा पाणी उपसा थांबवल्यास पुढील काळात पाणी टंचाई जानवणार नाही, असे निवेदन भिसेवाघोली ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. स्वयंम वायाळ यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.