मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला आहे. त्यांनी मंगळवारी (२० मे) सकाळी १० वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असणा-या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी त्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ यांची समजूत काढण्यास अजित पवारांना यश आले असून हे सर्व ८ दिवस आधीच ठरले होते, अशी माहिती स्वत: छगन भुजबळ यांनी दिली होती.
दरम्यान, त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मोजक्याच मंत्र्यांसह राजभवनात हा शपथविधी पार पडला. शपथ घेताच भुजबळ समर्थकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी त्यांची विधानसभा असलेल्या येवलामध्ये कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आपला आनंद व्यक्त केला.
शपथ घेण्यापूर्वी राजभवनात जाताना नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, सर्व ८ दिवसांपूर्वीच ठरले होते, मंगळवारी सर्व मंत्री उपस्थित असतात म्हणून मंत्रिपदाची शपथ ही मंगळवारी (२० मे) घेण्याचे ठरले आहे. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, छगन भुजबळ यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली. यानंतर भाजपा आमदार सुरेश धस आणि विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात मृत संतोष देशमुख यांचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खाते रिक्त होते. हे खाते आता छगन भुजबळ यांना मिळाले आहे