बुलडाणा : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून महिला जिल्हाध्यक्षाचे निलंबन झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनुजा साळवे यांच्यावर ही कारवाई झाली आहे. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
दरम्यान, अनुजा साळवे यांनी पक्षातील पदाधिका-यांवर जातीवादाचा, अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत १५ डिसेंबर २०२४ मध्ये राजीनामा पाठवला असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील आणि मनोज कायंदे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र देत, महिला जिल्हाध्यक्ष पक्ष संघटनेबाबत निष्क्रिय असल्याची तक्रार केली होती. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद नसून, फक्त समाज माध्यमांवर सक्रिय आहेत, असेही तक्रारीत म्हटले होते.
विधानसभा निवडणुकीत सिंदखेडराजा मतदारसंघातील उमेदवार मनोज कायंदे यांच्याविरोधात काम केले. प्रचारात सक्रिय नव्हत्या. अजितदादांची सभा होती, त्यावेळी हजेरी लावली. सभा रद्द होताच, सभास्थळ सोडले. छगन भुजबळ यांची सभा झाली. त्यावेळी त्या उपस्थित नव्हत्या. संघटन नसल्याने त्या एकट्या असतात, अशी तक्रार केली होती.
महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या तक्रारीची दखल घेत अनुजा साळवे यांना पक्षातील पदावरून निलंबित केले आहे. दरम्यान अनुजा साळवे यांनी नाझीर काझी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण पक्षाचा राजीनामा त्यांच्या तक्रारीपूर्वीच पाठवला असल्याचा दावा केला.
नाझीर काझींवर आरोप
अनुज साळवे यांनी रुपाली चाकणकर यांना पत्र देताना, नाझीर काझी यांच्याकडून पक्षात सतत अपमानाची वागणूक मिळाली. पक्षात गेल्या चार वर्षांपासून निष्ठेने सक्रिय असून प्रामाणिकपणे काम केले. माझ्या निष्ठेविषयी सतत चुकीची माहिती पसरवली गेली. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून पक्ष संघटना टिकणार नाही. जातीयवाद फोफावला, तर सामान्यांना न्याय मिळणार नाही. मराठा समाजातील सक्षम महिलेला अशा पद्धतीने राजीनामा द्यावा लागत आहे, हे निराशाजनक आहे, असे म्हटले आहे.