नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियमांचे पालन न केल्याबद्दल वेळोवेळी बँका आणि ‘एनबीएफसी’वर दंड ठोठावते. आता रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जन स्मॉल फायनान्स बँकेला नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. काही त्रुटींमुळे बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयने एसबीआयला १,७२,८०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. याआधीही केंद्रीय बँकेने एसबीआयला दंड ठोठावला आहे. यावेळीही काही नियमांचे पालन न केल्याबद्दल एसबीआयवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.
नियमांचे पालन न केल्याबद्दल आणि बँकेच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित न करण्यासाठी हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. याशिवाय, आरबीआयने जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या नियमांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
दोन्ही प्रकरणांमध्ये बँकांच्या त्रुटींच्या आधारे दंड आकारण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेनेही नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासही सांगितले आहे. या प्रकारच्या कारवाईचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नाही.