मुंबई : प्रतिनिधी
उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने रिलायन्स पॉवरवर घातलेल्या बंदीला आणि जाहीर नोटीसला स्थगिती दिली आहे. यानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला रिलायन्स पॉवरने जाहीर केले होते की, त्यांना सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने एक नोटीस पाठवली होती. ‘एसईसीआय’च्या नोटीसनंतर रिलायन्स पॉवर आणि त्यांच्या सहायक कंपन्यांवर भविष्यकाळातील सर्व टेडर्समध्ये सहभागी होण्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आता मात्र दिल्ली हायकोर्टानं अनिल अंबानींना दिलासा दिला.
सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून घालण्यात आलेली बंदी आणि जाहीर नोटीसनंतर रिलायन्स पॉवरने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. अनिल अंबानींकडून ‘एसईसीआय’च्या नोटीसला आणि निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. २६ नोव्हेंबर २०२४ ला दिल्ली हायकोर्टाने ‘एसईसीआय’च्या नोटीसला आणि निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.