सोलापूर : विजयपूर रायचूर पॅसेंजरमधून सोलापूरला येत असताना अज्ञात इसमाने पॅसेंजरवर फेकलेला दगड लागून एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि. 20 एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
शिवानी उर्फ आरोही अजित कारंगे असे त्या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. एप्रिल महिन्यात लच्याण येथे यात्रा असल्याने कारंगे कुटुंबीय लच्याणला गेले होते. यात्रा संपल्यानंतर रविवारी ते माघारी सोलापूरला येत होते. दरम्यान होटगी गाव परिसरात गाडी आल्यानंतर अज्ञात इसमाने गाडीवर फेकलेला दगड शिवानीला लागला. त्यात शिवानी गंभीर जखमी झाली. त्या अवस्थेत तिला सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आपल्या मुलीचा मृत्यू झाला ही बातमी मिळताच आई-वडिलावर दु:खाचा डोंगर कोसळला. सिव्हिलमध्ये त्यांचा आक्रोश लोकांना पाहवत नव्हता. नेमकं दगड मारणारा इसम कोण होता ही माहिती समोर आली नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेल्वे पोलीस दाखल झाली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहे.