लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात २०२१-२२ ते २०२४-२५ पर्यंत व त्यापूर्वी सार्वजनीक कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेली होती. सार्वजनीक कामे मोठया प्रमाणात अपूर्ण आहेत. त्यामुळे मंजूर कामांना वर्क कोड दिलेली, पण सुरू न झालेली कामे सुरू न करण्याच्या सुचना रोहयोच्या नागपूर आयुक्तांनी दिल्याने लातूर जिल्हयातील रोहयोची मंजूर, पण सुरू न झालेली २ हजार १३६ सार्वजनीक कामे थांबवली आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्हयात घेण्यात आलेल्या वैयक्तीक व सार्वजनीक ४ हजार ३८५ कामापैकी ३ हजार १६० कामे पूर्ण झाली. तर १ हजार २२५ कामे अद्याप अपूर्णच आहेत. जुनी कामे अपूर्ण असताना नविन कामे घेतली जात असल्याने अपूर्ण कामे पूर्ण होण्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे शासन स्तरावरून सार्वजनीक मंजूर कामांना वर्क कोड दिलेली, पण सुरू न झालेली मातोश्री पाणंद रस्ते, शेत रस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते, क्रीडांगणाची २ हजार १३६ कामे सुरू न करण्याच्या सुचना रोहयोच्या नागपूर आयुक्तांनी दिल्याने लातूर जिल्हयातील रोहयोची सार्वजनीक कामे थांबवली आहेत. रोहयोची कामे थांबल्याने ग्रामीण भागातील नागरीकांचा रोजगार बुडत आहे. ऐन कामाच्या हंगामात कामे बंद ठेवण्यात आल्याने मजूरांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.