कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाची माहिती उघड केली आहे. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून केलेल्या पत्रव्यवहारात, लंडन येथून आणणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने लंडनमधील वाघनखे परत आणण्याचा दावा केला होता. मात्र म्युझियमने पाठवलेल्या पत्रामुळे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
इंद्रजित सावंत यांनी सांगितले की, १९७१ मध्ये ही वाघनखे लंडनमध्ये ठेवण्यात आली आहेत आणि त्यामुळे ही वाघनखे खरी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सरकारला जनतेची दिशाभूल करू नये असे आवाहन केले आहे. सावंत यांनी म्हटले की, लंडन संग्रहालयाने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे या वाघनखांच्या प्रतिकृतीवर करोडो रुपये खर्च करू नका असे सावंत यांनी सांगितले. त्यांनी हे वाघनखे छत्रपती शिवरायांची नसल्याचे लिहणे बंधनकारक केले असताना, राजकीय नेते महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत असेही म्हटले आहे.
ऐतिहासिक सत्य
इंद्रजित सावंत यांच्या मते, लंडनमध्ये सहा वाघनखे आहेत आणि त्यापैकी एक आणून फसवणूक केली जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अस्सल वाघनखे ही सातारा येथेच आहेत. प्रतापंिसह महाराज यांनी लंडनमध्ये वाघनखे दिल्याची माहिती हे त्यांच्या चरित्राचे हनन करण्यासाठी दिली जात आहे.
ताबडतोड स्पष्टीकरण आवश्यक
सावंत यांनी सरकारने ताबडतोड यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. सातारा राजघराण्याकडे ही वाघनखे आहेत आणि ते घराणे कधीतरी स्पष्टीकरण देतील, असेही त्यांनी सांगितले. शेवटी, उदयनराजे यांनीच आता पुढे येऊन याची माहिती द्यावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे. लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली आहेत, याबाबत अनिश्चितता आहे असे पत्र व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट म्युझियमने दिले आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतानी म्युझियमसोबत केलेल्या पत्रव्यवहारातून ही माहिती समोर आली आहे.