26 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeमहाराष्ट्रलसणाच्या किमतीत घट; गृहिणींना दिलासा

लसणाच्या किमतीत घट; गृहिणींना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या लसणाच्या दरात घट झाली असून सर्वसामान्य नागरिक याबाबत समाधान व्यक्त करत आहेत. किरकोळ बाजारात ४०० रुपये किलोने असलेल्या लसणाच्या किमतीत घट झाली असून २०० रुपयांनी लसूण स्वस्त झाला आहे. त्यामुळे गृहिणींना याबाबत दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लसणाची फोडणी प्रचंड महागली होती. परंतु, मार्केटमध्ये लसणाची आवक वाढल्यामुळे आता भाव निम्म्यावर आले आहेत. सध्या लसणाच्या दरात घट झाल्याने बाजारात घाऊक किमतीने ५० ते १२० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

लसणाचे सर्वसाधारण दर हे १०० ते १५० रुपये किलो असेच असतात. मात्र तीन वर्षांपूर्वीपासून हे दर सातत्याने वाढत होते. मुळात लसणाची लागवड कमी झाल्याने उत्पादन कमी यायला सुरुवात झाली. मात्र बाजारात लसणाला मोठी मागणी असल्याने मागणीइतका पुरवठा बाजारात होत नव्हता. त्यामुळे मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडले आणि लसणाचे दर वाढायला सुरुवात झाली. २०० रुपये किलोपासून हे दर वाढत वाढत ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे लसणाची फोडणी देणे सर्वसामान्यांना परवडत नव्हते. या वाढत जाणा-या दरामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत होती.

नव्या लसणाची आवक मोठ्या प्रमाणात
याच पार्श्वभूमीवर फेब्रुवारीपासून बाजारात नव्या लसणाची आवक सुरू झाली आहे. लसणाला चांगला दर मिळत असल्याने गेल्या वर्षी अनेक शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात लसणाची लागवड केली. त्यामुळे आता बाजारात चांगला लसूण येत आहे. लसणाची मोठी आवक मध्य प्रदेश इंदौरमधून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR