जळगाव : काही दिवसांपूर्वी लसणाचा दर ४०० रुपये किलोवर गेला होता. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले होते. मात्र आता लसणाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
मध्य प्रदेशातून नवीन लसूण बाजारात येण्याचे प्रमाण वाढल्याने दरात घसरण झाली. ४०० रुपये किलोवर असलेला लसूण सध्या १०० रुपये किलोपर्यंत घसरला. दर घसरल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे
नवीन लसणाची काढणी वाढल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दर कमी होतील, असा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त केला आहे. नवीन ओला लसूण बाजारात आला आहे. यामुळे दरात घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात ४०० ते ४२० रुपये किलोवर असलेला लसूण आता १०० रुपये किलोने विक्री होत आहे. नुकताच काढणी झालेला ओला लसूण बाजारात आल्याने मागणीही वाढली आहे. मध्य प्रदेशातून येणा-या नवीन लसणाची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
सध्या बाजारात केवळ पांढरा संकरित लसूण उपलब्ध होत आहे. बाजारात आवक वाढल्याने शहरातील विविध भागांमध्ये हातगाडी व रिक्षांमधून विक्री होत आहे. लसूण खरेदी करण्यासाठी महिलांकडून पसंती दिली जात आहे. पावशेर लसूण घेणा-या महिला आता एक ते दोन किलोवर लसूण खरेदी करताना दिसत आहेत.