21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरलाडकी बहिण: आता लाभार्थ्यांची होणार छाणनी

लाडकी बहिण: आता लाभार्थ्यांची होणार छाणनी

लातूर : सिद्धेश्वर दाताळ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लातूर जिल्ह्यातून आजवर आलेल्या सुमारे ६ लाख लाभार्थी महिलांच्या अर्जांची लवकरच छाननी करण्यात येणार आहेत. संबंधित महिला खरोखरच योजनेच्या निकषात बसतात का, त्यांना सरकारचा १ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त निधी इतर योजनेतून मिळतो का, त्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे का, घरात कोणी सरकारी नोकरदार आहे का याची फेरपडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना मिळणा-या निधीला आता कात्री बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चा झाली ती ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची. या योजनेमुळे महायुती सरकारला महिलांनी भरभरून मते दिली. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर ‘लाडक्या बहिणीं’ बाबत महायुतीचे सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शपथविधी सोहळयानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार असून १ हजार ५०० ऐवजी २ हजार १०० रुपये देण्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ, असे सांगितले. लाडकी बहीण योजनेत किती महिला निकषाच्या बाहेर आहेत, याबाबतची फेरपडताळणी केली जाणार आहे, असेही स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर प्रशासनाकडून आता आजवर आलेल्या अर्जांची फेरपडताळणी करण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी संजय गांधी निराधार योजना किंवा सरकारच्या इतर योजनांमधून महिलांना निधी मिळतो आहे का याची प्रामुख्याने पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर सरकारचे सूचनेनुसार ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे, लाभार्थी महिलेचे पती सरकारी नोकरदार आहेत का यासह इतर बाबींची पडताळणी करून निकषात न बसणा-या महिलांचा निधी बंद केला जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR