लातूर : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या एकाही महिला भगिनीला आता अपात्र ठरवण्यात येऊ नये, एस. टी. बसमध्ये महिलांना सरसगट मोफत प्रवास योजना लागू करावी त्याच बरोबर महानगरपालिकेच्या सिटी बसमध्येही लातूरप्रमाणे महिलांसाठी मोफत प्रवास योजना सुरू करावी आदी मागण्या माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना केल्या आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्य शासनाच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुरवणी मागण्यांच्या मर्यादा राज्य शासनाने ओलांडल्या असल्याचे नमूद करून यावरून राज्य दिवाळखोरीत जात असल्याचे स्पष्ट जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले.
लाडकी बहीण योजना :
लाडकी बहीण योजनेवर बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, निवडणुकीपूर्वी जेव्हा शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा पात्र-अपात्रतेबाबतचे कोणतेही नियम पाहिले नाहीत. आता निवडणूक संपून सत्ता मिळाल्यानंतर मात्र सत्ताधारी मंडळी नियम दाखवून पात्र ठरलेल्या महिला भगिनींना अपात्र ठरवत आहेत. एक वेळा पात्र ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतल्या कोणत्याही महिला भगिनींना या लाभापासून वगळण्यात येऊ नये, अशी जोरदार मागणी त्यांनी या वेळी केली.
महिलांच्या समस्यांवर प्रकाश :
राज्यात महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना पाहता शक्ती कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, महिलांना काही सार्वजनिक कार्यावर अन्य कामावर चर्चा करायला, एकत्र यायला जागा नाही याचा विचार करता शासनाने महिलांसाठी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर महिला भवन उभारावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून सध्या ५० टक्के तिकिट दरात सूट दिली जाते. ही सूट १०० टक्के करून महिलांना मोफत प्रवास योजना लागू करावी, असे त्यांनी म्हटले आहे. लातूर मनपाने महिलांसाठी सिटी बसमधून मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. राज्य शासनाने राज्यभरातील मनपा क्षेत्रात मोफत सिटी बस योजना सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
लातूरच्या जिल्हा रुग्णालयास निधीस मंजुरी :
लातूर येथे जिल्हा रुग्णालय बांधकामासाठी निधी उपलब्ध आहे मात्र जागेचा मावेजा देण्यासाठी निधी मिळत नसल्याने हे बांधकाम अनेक वर्षापासून ररखडलेले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकढून कृषी विद्यापीठाला जागेचा मावेजा देण्यासाठी आता तरतूद करण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मला सांगितले आहे. त्याबद्दल मी येथे त्यांचे व शासनाचे आभार मानतो आहे, असे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.