39.2 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’मुळे वृद्ध कलाकारांचे मानधन रखडले

‘लाडकी बहीण’मुळे वृद्ध कलाकारांचे मानधन रखडले

मुंबई : प्रतिनिधी
‘लाडकी बहीण’ योजना किती फसवी आहे ते आपण निवडणुकीनंतर पाहिले. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार होते. आता संबंधित खात्याच्या मंत्री महिला आहेत, त्यांनी ते शक्य नाही सांगितले, ही महिलांची फसवणूक असून शासनाच्या तिजोरीवर भार पडत आहे. योजनेमुळे वृद्ध कलाकारांचे मानधन रखडले असल्याचे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई येथे बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, आज जागतिक महिला दिन आहे. पण महाराष्ट्राची गेल्या काही महिन्यांतली अवस्था पाहिली, तर महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार देशात सर्वाधिक आहेत. मंत्री त्यात सामील आहेत. सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत. पोलिसांवर दबाव आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या माध्यमातून दीड हजार रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत, या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्र आणि महिलावर्गाची फसवणूक करत आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.

मला काल काही वुद्ध कलाकार भेटले. त्यांना दर महिन्याला सरकारकडून काही मानधन मिळतं. त्यांनी मला सांगितलं की, लाडकी बहीण योजना आल्यापासून वुद्ध कलाकारांना त्यांचं मानधन मिळालं नाही. ही आर्थिक अवस्था या राज्याची आहे. आर्थिक पाहणी अहवाल आला आहे, त्यावरच बोट दाखवलंय. हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडतय. या राज्यामध्ये आर्थिक अराजक माजले आहे. वृद्ध कलाकार काल माझ्याकडे अक्षरक्ष: रडत होते, असेही संजय राऊत म्हणाले.

योजना फसवी नाही का?
सरकारने महिलांना २१०० रुपये द्यायचं कबूल केलं आणि आता द्यायला तयार नाही. या योजनेतून पाच लाख महिलांची नावं कापली गेली, मग योजना फसवी नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

१६ लाख कोटी कागदावर
मुख्यमंत्र्यांनी काल १६ लाख कोटींची गुंतवणूक आणली असे सांगितले, त्यावर संजय राऊत म्हणाले की, १६ लाख कोटी देशात कधी येतात, ते पहावे लागेल. १६ लाख कोटी कागदावर आहेत. हे मोठमोठे आकडे देतात. कृषी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्याच्े श्रेय सरकारने घेऊ नये किंवा कृषी मंत्रालयाने घेऊ नये, याचे श्रेय शेतक-यांचे आहे.

उद्योग-सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर
उद्योग-सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर आहे, याचे कारण की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात गेले. दुसरे अजय अशरसारखे लोक उद्योग-सेवा क्षेत्रात मागे पडण्याचे एक कारण आहे. मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून ते काम करत होते. त्यांनी काय केलं? कशी लूट केली? अजय अशर फॉर्म्युल्यामुळे आपण उद्योग-सेवा क्षेत्रात मागे राहिलो, असे संजय राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR