मुंबई : महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोव-यात सापडली आहे. एकीकडे योजना बंद होणार असल्याचे बोलले जात होते. अखेर या चर्चांना महिला व बाल विकास विभागाकडून पूर्णविराम देत योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आजपासून (२५ फेब्रुवारी) दिला जाणार आहे. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग करण्यात आली आहे. काही तांत्रिक बाबीमुळे पैसे देण्यास उशीर झाला आहे.
विरोधकांची महायुती सरकारवर टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात भाष्य करताना लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी ३५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात पैसे मिळण्यास सुरुवात होतील, असे म्हटले होते. मात्र, अद्याप हप्त्याची रक्कम जमा होत नसल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत होती.
९ लाख महिलांची संख्या कमी
जानेवारी महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे ९ लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती. त्यामुळे यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये मिळतील.