छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून १५०० परत घेण्यात येतील असे धक्कादायक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले आहे. रवी राणांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीने जोरदार पलटवार केला आहे. रवी राणा हे शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातले बोलले असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. रवी राणांचे वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, त्याबद्दल सरकारने माफी मागावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, हा सरकारचा पैसा आहे. हा पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणा की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे? यांची नीती दिसली. निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली. बहिणींना फसवण्यासाठी योजना आणली आहे. रवी राणा जे बोलला ते सरकारच्या शिंदेंच्या मनातील, फडणवीस आणि अजित पवार यांच्या मनातील बोलले आहेत.
विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली आहे. मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी… आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मतं विकतील का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान, बहिणींचा अपमान आहे. ही योजना मतांसाठी आणली होती. सरकारने राज्यातील बहिणीची माफी मागितली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नोंदणी अजून सुरू आहे. पहिला हप्ता रक्षाबंधन दिवशी जमा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले, आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे दीड हजारांचे तीन हजार करू, मात्र तुम्ही निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर दीड हजार रुपयेही काढून घेऊ, असे राणा म्हणाले. ज्यांचं खाल्लं त्यांना जागलं पाहिजे. सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असे मत रवी राणा यांनी मांडले. राणांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खरपूस समाचार घेतला.