24.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeलातूरलातुरात दिवाळी 

लातुरात दिवाळी 

लातूर : प्रतिनिधी
प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी आयोध्येत दि. २२ जानेवारी रोजी श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने लातूर शहरातही आनंदोत्सव साजरा केला जात आहे. संपूर्ण शहर विद्यूत रोषणाईने उजळून  निघाले आहे. आकाश दिवे, भगव्या पतांकांनी शहर सजले आहे. लातूर शहरात दिवाळी साजरी केली जात असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आनंदाला उधान आले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
श्रीराम यांच्या मुर्तीची अयोध्येत प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्ताने लातूर शहरात गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी केली जात आहे. शहरातील गंजगोलाई, मेन रोड, हनुमान चौक, महात्मा गांधी चौक, लोकमान्य टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, संपूर्ण औसा रोड, अंबाजोगाई रोडवरील व्यापारी पेठा विद्यूत रोषणाईने झगमगुन गेल्या आहेत. भगव्या पताकांनी लातूर शहर सजले आहे. जागोजागी श्रीराम यांच्या प्रतिमा असलेले बॅनर, पोस्टर्स्, फलेक्स लावण्यात आलेले आहेत. शहरातील जवळपास सर्वच मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. सार्वजनिक स्वरुपातही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
प्रसादाचे १.२५ लाख लाडूचे  राम भक्तांना वाटप होणार
अयोध्येतील प्रभु श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या आनंदसोहळ्या प्रीत्यर्थ सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता लातूर येथील हनुमान चौकात भव्य स्वरुपात रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठापना दिन सोहोळ्यानिमित्त राम भक्त्तां सव्वा लाख लाडाचे वाटपही करण्यात येणार आहे.
समस्त प्रभु श्रीराम भक्त्तजनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचा प्रारंभ सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन होईल. त्यानंतर ५.४५ वाजता सुप्रसिद्ध गायिका सुचित्रा भागवत यांच्या प्रभु श्रीराम सुश्राव्य गीत गायनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६.३० वाजता श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतलेल्या कारसेवकांचा भव्य सत्कार केला जाईल. तसेच ६.४५ वाजता लोकरंगप्रस्तुत ‘रामजी की निकली सवारी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. रात्री ८ वाजता विद्यार्थी व युवकांचा नृत्य वंदना आणि रात्री ८.३० वाजता सामूहिक रामरक्षा व हनुमान चालीसा पठण व  प्रभु श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आनंदोत्सवानंतर  उत्सवाचा समारोप भव्य आतषबाजीने होणार आहे. समस्त लातूरकरानी या राष्ट्रीय आनंदोत्सवात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR