तांदूळजा : शिवाजी गायकवाड
लातूर तांदूळजा कळंब या महामार्गाच्या रस्त्याच्या दुतर्फा उपद्रवी झाडे झुडपे वाढल्यामुळे येणा-या जाणा-या पादचारी छोट्या-मोठ्या वाहनधारकांना समोरून नेमके कोणते वाहन येत आहे हे स्पष्ट आणि सहज दिसत नसल्यामुळे वाहन चालवताना संभ्रम निर्माण होत आहे. शिवाय अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे महामार्ग रस्त्याच्या साईट पट्ट्यावर वाढलेल्या झाडाझुडपांची तात्काळ कटाई करावी अशी मागणी वाहनधारक व पादचा-यातून होत आहे.
लातूर-तांदुळजा-कळंब या महामार्गाचे काही ठिकाणी काम रखडले असून ज्या बाजूचे काम पूर्णत: काही प्रमाणामध्ये झाल्याचे दिसून येत असले तरी या रस्त्यावरील साईट पट्ट्यावर झाडे-झुडपे वाढल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या अंदाजपत्रकामध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तब्बल दहा वर्षात रस्त्याची देखभाल, दुरुस्तीचे काम संबंधित एजन्सीनेच करायचे असल्याची तरतूद करण्यात आलेली असते मात्र काही ठिकाणी चकाचक झालेला राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा झाडाझुडपांनी व्यापलेला दिसून येत आहे. साईड पट्ट्या झाकून गेल्यामुळे पादचारी व छोट्या वाहनांना वाहतूक करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. समोरून नेमके कोणते वाहन येत आहे हे स्पष्ट दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडाझुडपांची कटाई करणे अत्यंत गरजेचे असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी रस्त्यात झाडेझुडपे खड्डे नाल्या साचलेले पाणी काढून रस्ते अडथळे मुक्त करण्यासाठी व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचे संवर्धन संरक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ‘गँगमन’ नावाचे कर्मचारी कार्यरत होते. ठराविक किलोमीटरमध्ये हे गँगमन दररोज टोपली, फावडे, कु-हाड, टिकाव, कुदळ घेऊन दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे कापून रस्त्यातील अडथळे दूर करण्याची कामे करत होते परंतु सध्याच्या काळात गँगमन नावाचा कर्मचारी लुप्त झाल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडेझुडपे कटाई करावी अशी मागणी होत आहे.