36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeलातूरलातूर तालुक्यात शेतक-यांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी मोहीम राबवा

लातूर तालुक्यात शेतक-यांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी मोहीम राबवा

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या साहाय्याने लातूर तहसीलने आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान देऊन माता-भगिनींना आर्थिक बळ दिले आहे. शेतक-यांवर अशी वेळ येऊ नये यासाठी लातूर तालुक्यात शेतक-यांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. लोकनेते विलासराव देशमुख यांनी नेहमी या दिशेने प्रयत्नांचे आवाहन केले होते. घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी त्याप्रमाणे आम्ही नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत, असे सांगून प्रशासन नागरिकाच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
लातूर तहसील कार्यालय येथे दि. १६ एप्रिल रोजी लातूर तालुक्यातील खोपेगाव आणि चांडेश्वर येथील नागरिकांना कबाले वाटप करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात अनुदानही वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूरचे उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, नायब तहसीलदार गणेश सरवदे, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, चांडेश्वर आणि खोपेगाव येथील काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते खोपेगाव येथील शंकर चंदर मोरे, जयवंत सूर्यभान पवार, कोंडीबा गंगाराम वाघमारे, दिगंबर गंगाराम वाघमारे आणि चांडेश्वर येथील अजयकुमार सपाटे, बालाजी नलावडे, चंद्रकांत नलावडे यांना प्रातिनिधिक स्वरुपात कबाले वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेचा वीस हजार रुपयांचा अर्थसहाय्याचा धनादेश सारिखा संजय मुळे यांना देण्यात आला.
गंगापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे कुटुंबीय कोमलबाई शिवाजी धोत्रे यांना एक लाख रुपयांच्या शासकीय अनुदानाचा धनादेश वाटप करण्यात आला. पुढे बोलताना ते म्हणाले, लातूर तहसील कार्यालय हे महाराष्ट्रात नावाजलेले तहसील कार्यालय आहे. लोकनेते विलासराव देशमुख हे तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर तहसील कार्यालयाच्या आराखड्याला परवानगी दिली. माता-भगिनींना शासनाच्या अर्थसहाय्यातून जीवन जगण्यासाठी बळ मिळेल. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांना लातूर तहसीलकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले. लातूर तहसीलनेही लातूर तालुक्यात एक मोहीम राबवून शेतक-यांच्या आत्महत्या शून्यावर आणाव्यात, असे लोकनेते विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे. घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी, त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहोत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR