लातूर : प्रतिनिधी
वैवाहिक जीवनातील कलहांमुळे अनेक दाम्पत्यांचा संसार मोडतो. त्यांना विभक्त होवून जीवन जगावे लागते. विवाहानंतरचे असे कलह टाळण्यासाठी आपल्या जोडीदाराला, त्याच्या कुटुंबियांना समजून घेण्यासाठी, त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याबाबत मदत करण्यासाठी विवाहपूर्व संवाद केंद्र लातूर जिल्हा परिषद येथे सुरु करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विवाहपूर्व संवाद केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख, संरक्षण अधिकारी गणेश जोंधळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नियोजित वधू-वरांशी यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवाद साधला.
विवाहापूर्वी एकमेकांविषयी, कुटुंबियांविषयी जाणून घेतल्याने विवाहानंतर होणारे अनेक वाद टाळले जावू शकतात. सध्या लग्न जमल्यानंतर नियोजित वधू-वर एकमेकांशी वेगवेगळ्या विषयांवर बोलतात. मात्र, एकमेकांविषयी माहिती जाणून घेणे, कुटुंबियांच्या अपेक्षा यासारख्या विषयांवर अपेक्षित चर्चा होत नाही. त्यामुळे अशी चर्चा घडवून आणण्यासाठी विवाहपूर्व संवाद केंद्र उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच वैवाहिक जीवनात एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांचा समजून घेत, एकमेकांचा सन्मान जपण्याला महत्व दिल्यास विवाहानंतरचे अनेक वाद टळतील, असे त्या म्हणाल्या.
विवाह ही आयुष्यातील खूप महत्वाची घटना असते. एकमेकांना समजून घेत वैवाहिक जीवन प्रवास करणे, येणा-या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जावून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करायला हवा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना म्हणाले. विवाहपूर्व संवाद केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्याशी जिल्हाधिका-यांनी संवाद साधला. तसेच याठिकाणी येणा-या प्रत्येक नियोजित वधू-वर, त्यांचे कुटुंबीय यांच्यात संवाद घडवून आणावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे सांगितले. यावेळी उपस्थित लातूर व जेवळी येथील नियोजित वधू-वरांशीही त्यांनी संवाद साधला.