लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत, लातूरच्या जनतेने मलाही मुंबईला पाठवले, विठ्ठलाचा वारकरी ओठात ते पोटात असाच असतो, असे सांगून वारकरी परंपरा कायम राहावी यासाठी कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच वारक-यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि लातूर येथे वारकरी भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी देऊन श्री सत्संग प्रतिष्ठान, लातूरच्या सेवाकार्याचे मनापासून कौतुक केले.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी लातूर शहरातील गांधी चौक परिसरातील मध्यवर्ती बस स्थानकात जाऊन श्री सत्संग प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने आयोजित पंढरपूर आषाढी वारी वारकरी मोफत यात्रा व भोजन सेवेला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वारक-यांना शुभेच्छा दिल्या, तसेच समाजात उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ उद्योजक रमेश राठी, लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आकाश राठी, आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचचे प्रदेश अध्यक्ष कैलास राठी, गीता परिवार तेलंगणाचे संचालक जुगल बियाणी, लातूर शहरचे पोलीस उपाधीक्षक रणजीत सावंत, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, एसटी महामंडळाचे लातूर विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव, आगार प्रमुख बाळासाहेब राठोड, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, श्री सत्संग प्रतिष्ठान लातूरचे अध्यक्ष गोविंद पारिख, सचिव चंदूसेठ लड्डा, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, माजी सभापती ललितभाई शहा, दिलीप माने, प्रकाश कासट, अशोक गोविंदपुरकर, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मैनोद्दीन पठाण, लातूर मजूर फेडरेशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, रमेशचंद्र भूतडा, दत्ताअप्पा लोखंडे, श्याम मुंदडा, जुगलकिशोर झंवर, लक्ष्मीकांत बियाणी, केतन हलवाई, विजय वर्मा, संग्राम खंदारे, बालाजी बारबोले, मधुसूदन भुतडा, डॉक्टर चेतन सारडा, विजय गिल्डा, तुळशीराम गंभीरे, माधव गंभीरे, बालाप्रसाद बिदादा, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, गणेश एसआर देशमुख, अशोक अग्रवाल, प्रवीण सूर्यवंशी आदिसह काँग्रेस
पक्षाचे विविध पदाधिकारी आणि वारकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी श्री सत्संग प्रतिष्ठान, लातूरच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. प्रतिष्ठानने पंढरपूरला निघालेल्या वारक-यांच्या प्रवासाची आणि भोजनाची मोफत व्यवस्था केली असून, गेली अनेक दशके हे सेवाकार्य सुरू आहे, असे ते म्हणाले. गोविंद पारिख यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला, याचा उल्लेख करत, खरंच मागचे दिवस हे सोनियाचे दिवस होते. लातूरच्या जनतेने लोकनेते विलासराव देशमुख यांना मुंबईला पाठवले, तसेच त्यांच्या देशमुख कुटुंबातील सदस्याला म्हणजे मलाही मुंबईला पाठवले. विठ्ठलाचा वारकरी असाच असतो, जे ओठात ते पोटात, जे पोटात तेच ओठात असते, असे वारकरी आपल्या लातूरात आहेत. ही परंपरा शतकानुशतके टिकली पाहिजे यासाठी कायम आम्ही सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी गोविंद पारिख, प्रा. शिवराज मोटेगावकर आणि लक्षमीरमण लाहोटी यांनी मनोग व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल गालीब शेख यांनी केले, तर शेवटी आभार चंदूशेठ लड्डा यांनी मानले.