लातूर : प्रतिनिधी
शहरातील फेरीवाले व पथविक्रेत्यांना लातूर शहर महापालिका प्रशासनाने अधिकृत पथविक्रेता परवाने जानेवारी २०२२ मध्ये दिले. तेव्हापासून म्हणेजच गेल्या एक वर्षापासून पथविक्रेते दर महा ५०० रुपये भाडे महानगरपालिकेच्या तिजोरीत भरीत आहेत. परंतू, महानगरपालिकेकडून या पथविक्रेत्यांना गेल्या वर्षभरापासून पट्टे मारुन ४ बाय ६ चे गाळे उपलब्ध करुन दिलेली नाही. परिणामी हातगाडे रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानूसार लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला, पथविक्रेता धोरण राबविण्यात येत आहे. त्याकरीता शहरातील हॉकर्स झोन व नॉन हॉकर्स झोनविषयी लातूर शहर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाला प्रस्ताव दिलेला आहे. त्या प्रस्तावानूसार शहरातील गंजगोलाईमधील डिव्हायडरच्या आतील बाजू, गंजगोलाईतील मंदीराची गोलाकार जागा, जिल्हा क्रीडा संकुलाची संरक्षण भिंंत, अंबाजोगाई रोडवरील बस डेपोच्या पाठीमागील जागा, महात्मा गांधी चौकातील जुने रेल्वे स्टेशनच्या समोरील जागा, गांधी मार्केटमधील व्यंकटेश विद्यालयाची पाटभिंत, राजीव गांधी चौक परिसरातील बिडवे लॉन्सच्या बाजूचे गायरान, अष्टविनायक मंदीर परिसरातील जागा, बार्शी रोडवरील चौंडा हॉस्पिटलजवळील ग्रीन बेल्ट, खणीजवळील गायरान, ५ नंबर चौकापासून ७५ मीटरवरील खुली जागा, हॉकर्स झोन म्हणून दिलेल्या आहेत. त्यापैकी जिल्हा क्रीडा संकुलाच्या संरक्षण भिंतीला पुर्वीपासूनच पथविक्रेते आपापला व्यवसाय चालवत असल्यामुळे त्यांना जागेची अडचण नाही. परंतू इतर हॉकर्स झोनमध्ये अद्यापही महानगरपालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिलेली नसल्याने पथविके्रते आपापला व्यवसाय अनंत अडचणीतून चालवत आहेत.
शहर महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला, पथविक्रेता धोरण राबविण्या करीता महानगरपालिका प्रशासनाने शहरात ३ हजार फेरीवाले व पथविक्रेत्यांचा सर्वे केलेला आहे. त्यापैकी १ हजार ८०० फेरीवाले, पथविक्रेत्यांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे. गंजगोलाईत पिवळे पट्टे मारुन पथविकेत्यांना ४ बाय ६ ची जागा देण्याच्या कामास महानागरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशाने सुरुवात झाली होती. गंजगोलाईतील लोखंडी कठड्याच्या आत मारलेल्या पट्ट्यातच पथविक्रेते थांबतील. रस्त्यावर एकही पथविक्रेता येणार नाही. अशा पद्धतीने गंजगोेलाईत ३५० पथविक्रेत्यांना पिवळे पट्टे मारुन जागा दिली जात होती. परंतू, अचानक हे सर्व थांबले. का थांबले? या विषयी कोणीच काहींही बोलायला तयार नाही. गेल्या वर्षभरापासून पथविक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही.