लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. रविवारी तापमानाचा पारा जवळपास ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. उष्मा अन उकाड्याने लातूरकर व जिल्हावासीयांचा दिवसाचा आराम व रात्रीची झोप उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यावर गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्यान शनिवार व रविवारी तापमानाचा पारा ४० अंशाच्या पार सेल्सियसवर पोहोचला. वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट निर्माण झाल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी रस्त्यावरील रहदारीला चाप बसला पहावयास मिळाले. मागील तीन चार दिवसापासून या वाढत्या तापमानामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये, बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने हातगाडी, पाल मांडून व्यवसाय करणारे, दुचाकीस्वार, पादचारी घामाघूम होत आहेत. इमारतीवरील पाण्याची टाकी असो की घरातील भांड्यात ठेवलेले पाणी गरम होत आहे. घरातील फॅनदेखील गरम हवा मारत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना तापमानाच्या झळांचा त्रास अस होत आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठ्याचे वेगाने बाष्पीभवन होऊन ते कोरडे पडत आहे. मानवी आरोग्यावरही वाढत्या तापमानाचा परिणाम होत आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यातील इतर शहर व खेड्यापाड्यात ही शितपेयांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई डोके वर काढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पाणपोईंची संख्या ही रोडावल्याने यंदानागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यामुळे पाण्याचे दर वाढले असल्यामुळे नागरिकांच्या खिशावर आर्थिक भार पडत आहे.